लातूर,(जिमाका):- कोरोना विषाणूचा (कोवीड-19) प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी लातूर जिल्हयात 05 किंवा 05 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणेस दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मनाई करण्यात आली असून महानगरपालिका/ नगरपालिका /नगरपंचायत /ग्रामीण क्षेत्राकरिता परिशिष्ट अ, ब, क प्रमाणे सूचना निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात व लगतच्या कांही गावांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध हे दिनांक 15 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू करुन त्या नंतरच्या कालावधीकरीताचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येतील असे नमुद करण्यात आले होते. तथापी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदी/ प्रतिबंधात्मक आदेशाची लातूर शहर महानगरपालिका हद्दीत व लगतच्या कांही गावांच्या (गंगापूर, पेठ, चांडेश्वर, खोपेगाव, कव्हा, कातपूर, बाभळगाव, सिंकदरपूर, बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा, हरंगुळ बु., बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हणमंतवाडी, महाराणाप्रताप नगर ) हद्दीत अंमलबजावणी करताना पूढील बाबी लागु राहतील असे जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी आदेश जारी केले आहेत.
दिनांक 13,14, 15 व 16 ऑगस्ट 2020 या कालावधीत किराणा, भाजीपाला, फळे विक्री, बेकरी, मांस, मच्छी, अंडी विक्रीची दुकाने सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत सुरु ठेवता येतील. या व्यतिरिक्त इतर बाबीसंदर्भातीत निर्बंध दिनांक 16 ऑगस्ट 2020 पर्यंत लागु राहतील. दिनांक 13 ऑगस्ट 2020 पासून बँकांमधील सर्व प्रकारचे व्यवहार नियमीतपणे सुरु ठेवण्यात येतील. दिनांक 17 ऑगस्ट 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत पूढील नमुद केल्या प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
सर्व अत्यावश्यक सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनुसार सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना/ बाजारपेठा/ दुकाने सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील.मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील. मॉल मधील फुड कोर्ट/ रेस्टॉरंन्टस् फक्त घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. तसेच कोवीड-19 चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या नियमावीलचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.सिनेमागृह बंद राहतील.
जिल्हयाअंतर्गतची बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेनुसार सुरु राहील. शारीरिक अंतर राखणे व निर्जतुकीकरण करण्याची दक्षता घेणे बंधनकारक राहील. आंतरजिल्हा हालचाली/ वहातुक पुर्वीप्रमाणेच निर्बंधासह सुरु राहतील. खुल्या मैदानात शारीरिक क्रियाकलाप/ व्यायाम (Physical Activities) शारीरीक अंतराचे पालन करुन परवानगी राहील. वृत्तपत्रांच्या छपाई व वितरण (घरपोच सेवेसह ) सुरु राहील.सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. तथापि शैक्षणिक संस्था (विद्यापीठ/ महाविद्यालये/ विद्यालये) येथील कार्यालय/ कर्मचारी यांना प्रत्यक्ष अध्ययनाशिवाय ई-सामुग्री तयार करणे (Development of e-content ) उत्तरपत्रीका तपासणे आणि इतर संशोधन कामकाज करणेसाठी मुभा असेल.
केश कर्तनालये/ स्पा/ब्युटी पार्लर/ सलून दिनांक 26 जून 2020 मधील सुचनांचे पालन करण्याचे अधिन राहून सुरु ठेवण्यात येतील. वैयक्तिक खेळ (समूहाशिवाय) उदा. गोल्फ कोर्स, आऊट डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, आऊट डोअर बॅडमिंटन आणि मल्लखांब यास शारीरीक अंतर राखणे व निर्जतुकीरणाचे मानक पालनाच्या अधिन राहून परवानगी असेल. तरण तलाव सुरु ठेवता येणार नाहीत. वाहतुकीस पूढील प्रमाणे परवानगी असेल.
दुचाकी - चालक+ एक व्यक्ती (हेल्मेट आणि मास्क बंधनकारक) तीन चाकी -चालक + दोन व्यक्ती (फक्त अत्यावश्यक सेवेकरीता ) चार चाकी –चालक+ तीन व्यक्ती (फक्त अत्यावश्यक सेवेकरीता) वरील प्रमाणे वाहतुकी दरम्यान सर्व व्यक्तींनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.मंगल कार्यालय, कार्यक्रमाचे हॉल बंद राहतील. लग्न समारंभ, स्वागत समारंभ, गर्दी होईल असे सर्व समारंभास परवानगी नसेल. केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल. तसेच अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींना उपिस्थत राहण्यास परवानगी असेल. वरील बाबीशिवाय विशेष/सर्वसाधारण आदेशाव्दारे परवानगी देण्यात आलेल्या बाबी यापूर्वीच्या लगतच्या आदेशानुसार अनुज्ञेय असतील.
कोवीड-19 चा प्रादुर्भाव वाढु नये या दृष्टीकोनातून व्यापारी आस्थापनांचे सर्व मालक / चालक व कामगार यांनी कोरोना संसर्गाची तपासणी करुन घेणे बंधनकारक राहील. यासंदर्भात संबंधीत स्थानीक प्राधिकरण (महानगरपालिका/ नगर पंचायत/ नागर पालिका ) यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील व्यापारी असोसीएशन/ गट यांचेशी समन्वय साधुन सर्व व्यापारी आस्थापनांचे सर्व मालक / चालक व कामगार यांची कोरोना विषयक तपासणी करुन घेण्यासाठी कार्यक्रम आखावा. तसेच तातडीने तपासण्या पुर्ण करुन घ्याव्यात. जे व्यापारी /आस्थापना धारक तपासणी न करता व्यवसाय सुरु करतील, असे सर्व व्यक्ती दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील.
या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही. असे ही आदेशात नमुद केले आहे.